बाधित रुग्ण एकूण 103; सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात
पुणे – पुणे विभागात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 103 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही पुणे शहरात असून, पुणे शहर आणि ग्रामीण भागात 57, पिंपरी चिंचवडमध्ये 14, सातारा जिल्ह्यात 3, सांगली येथे 25 आणि कोल्हापूरमध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 2 हजार 18 होते. त्यापैकी 1 हजार 878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 140 चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1 हजार 777 नमुने निगेटिव्ह आहेत. तर 101 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे.
विभागामधील 8 हजार 178 प्रवाशांपैकी 3 हजार 996 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून 4 हजार 282 प्रवाशांबाबत फॉलोअप पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 15 लाख 61 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 72 लाख 87 हजार 291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा…
पुणे विभागात एकूण 88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण 12 हजार 848 बेडस् उपलब्ध आहेत. तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण 2 हजार 167 बेडस् उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क 49 हजार 845 ट्रिपल लेअर मास्क 4 लाख 69 हजार 194 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 781 पीपीई किट तसेच 12 हजार 944 सॅनीटायझर उपलब्ध असल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.