वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काल दुसऱ्यांदा करोना चाचणी घेण्यात आली पण त्यात त्यांना या विषाणूंची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाच्या नवीन चाचणी पद्धतीनुसार ही चाचणी घेण्यात आली. त्यांच्या चाचणीचा रिझल्टही पंधरा मिनिटांमध्ये प्राप्त झाला आहे. या चाचणीचा रिपोर्ट अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या प्रेस सेक्रटरी मार्फत सर्व माध्यमांपर्यंत पोहचवला.
करोनाची ही नवीन चाचणी पद्धत अत्यंत वेगवान आहे आणि सुलभ आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान अमेरिकेतील करोनाचे रुग्ण वाढतच असून या रुग्णांचा आकडा आता 2 लाख 45 हजारांवर गेला असून मृतांचे प्रमाणही सहा हजारांच्यावर गेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरील रूग्णांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाला आणि वैद्यकीय यंत्रणेला चांगलेच झुंजावे लागत आहे. करोना घटण्याची कोणतीही लक्षण अमेरिकत सध्या दिसून येत नसल्याने हा आकडा कितीवर जाईल याचा अंदाज घेणे कठीण बनले आहे.