नवी दिल्ली: करोनाविरोधी लढ्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना 11 हजार कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत. तो निधी वितरीत करण्याला शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मोदींनी राज्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. त्याला अनुसरून करोनाविरोधी लढ्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.
राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ती रक्कम उपलब्ध होईल. विलगीकरण सुविधांची स्थापना, तपासणीसाठी प्रयोगशाळांची उभारणी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आदींसाठी राज्यांना तो निधी वापरता येईल. संपूर्ण जगात हाहाकार उडवणाऱ्या करोना फैलावाचे संकट भारतावरही घोंघावत आहे. त्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सरसावली आहेत. त्यातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाविरोधी लढ्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्यांकडून केली जात आहे. आता केंद्राच्या निधीमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलासा मिळणार आहे. त्यातून करोनाविरोधी लढ्याची तीव्रता आणखी वाढवता येऊ शकेल.