मुंबई: राज्यातील ज्या भागात करोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत “क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. राज्यभरात सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये एकूण 2455 पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. कालपर्यंत सुमारे 9 लाख 25 हजार 828 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ज्या भागात करोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधीत रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलो मीटरपर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतात.
लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाछयाला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकाने पुढील 14 दिवस दररोज सर्वेक्षण करायचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्यास मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवण्यात येते.
दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रासाठी 292 पथक काम करीत आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 413, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये 210 पथके कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना योग्य ती माहिती द्यावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.