सियाटेलपासून धडा घ्यायला हवा होता; गांभीर्य ओळखण्यात ट्रम्प अपयशी
पुणे – चीनमुळे जगभर पसरलेल्या करोना विषाणूंचा धोका जसा रशिया आणि भारताने योग्यवेळी ओळखला तसा महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या प्रशासनाला ओळखता आला नाही. याच हलगर्जीपणामुळे आज करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, अशा शब्दात अमेरिकेत संगणक अभियंते म्हणून स्थायिक झालेल्या अमित लाळे व अमोल डोंगरे यांनी आपल्या भावना दुरध्वनीवरुन दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केल्या.
चीनमध्ये पहिला रुग्ण आढळला तेव्हा कोणालाही हा धोका जगभर पसरेल असे वाटले नव्हते. मात्र, जेव्हा वुहानमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली त्याचवेळी रशियाने त्याचा धोका ओळखला. पाठोपाठ भारतानेही खंबिर पाऊले उचलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम जनता कर्फ्युचे आवाहन केले. त्यावेळी लोकांना काळजी घेण्याचे केलेले आवाहन जनतेने फारसे गांभिर्याने घेतले नाही व त्यामुळेच त्यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. अशीच पाऊले उचलण्यात प्रथम ट्रम्प प्रशासन कमी पडले.
करोनाचा अमेरिकेतील पहिला रुग्ण सियाटेलमध्ये जेव्हा सापडला त्यावेळीही येथे कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यानंतर न्युयार्क, न्युजर्सी, वॉशिंग्टन, फ्लोरीडा आणि कॅलिफोर्नियात दरदिवशी रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले तरीही प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. योग्य वेळी हा धोका ओळखला गेला असता तर करोनाची व्याप्ती वाढलीच नसती, असे लाळे यांनी सांगितले.
करोनाचा धोका कोस्टल भागात जास्त आहे. त्यातही न्युयार्क आणि न्युजर्सीमध्ये परिस्थीती खूपच बिकट आहे. आपल्या प्रमाणेच लॉकडाऊन करण्यात आले असले तरीही ते शेल्टर इन प्लेस म्हणजे कायद्याने नव्हे तर सल्ला देत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या गेल्या मात्र, त्याला देखील उशिर झाला. अमेरिकेत आता अन्य देशांपेक्षाही जास्त काळजी घेण्यात येत आहे. मॉल, टर्मिनल्स, वाहतूक तसेच ज्या ज्या कारणांनी लोकांना बाहेर पडावे लागते त्या सर्वांवर बंधने लावण्यात आली आहेत. नॉर्थ कॅरोलिना, बॉस्टनसह देशाच्या मध्यवर्ती भागात याचा फारसा परिणाम दिसून येत नाही कारण इथे करोनाचा प्रार्दुभाव अन्य राज्यांपेक्षा खूपच कमी आहे. येथील नागरिक देखील अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यावर येत नाहीत. अगदी मॉर्निंग वॉकवरही बंधन नाही. इतकेच नाही तर विनाकारण मास्कही वापरु नका अशा सुचना करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जाताना कोणालाही हटकले जात नाही परंतू नागरिकांची गर्दी जिथे जास्त होऊ शकते अशा ठिकाणी पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे, असे अमोल यांनी सांगितले.
जगाच्या इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेतील नागरिक जास्त जागरुक आहेत. कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांचा जीव जास्त महत्वाचा हे धोरण असलेला पृथ्वीवरील एकमेव देश म्हणुन अमेरिकेचा उल्लेख केला जातो त्याची प्रचिती येथे करोनाच्या धोक्याचा मुकाबला करताना सातत्याने दिसून येते. प्रशासन देखील अचानक कोणतेही आदेश देऊन नागरिकांना घाबरवुन टाकत नाही. त्यांच्यात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे, त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे, असेही ते म्हणाले.
पटेल ब्रदर्सची चेन बंद केली
भारतात तसेच अन्य देशात जशी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकानांवर बंदी लावली. तशी नाही पण येथील प्रसिद्ध पटेल ब्रदर्सची दुकानांची साखळी इथे आहे. मात्र, ऍडव्हायजरी लॉकडाऊन झाल्यानंतर पटेल ब्रदर्सने अचानक वस्तूंची मोठी दरवाढ केली. त्यांच्या या कृतीमुळेच अमेरिका प्रशासनाने त्यांच्यावर बंदी लावली. नागरिकांना दैनंदीन वापराच्या जीवनावश्यक वस्तू मुळ किंमतीतच उपलब्ध व्हाव्यात असा दृष्टिकोन न ठेवता केवळ नफा कमावण्याच्या हेतूने ही दरवाढ केल्याबद्दल ताशेरे ओढत ही साखळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
बिनडोकांची अमेरिकेतही जंत्री
भारतात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडु नये अशा सुचना वारंवार देऊनही बिनडोक लोक विनाकारण रस्त्यांवर दिसून येतात. पोलीस तसेच अन्य सुरक्षा यंत्रणा अशा लोकांवर कारवाई देखील करतात, त्याचे वृत्त प्रसिद्धही होते. मात्र, तरीही लोक जीव धोक्यात घालून बाहेर फिरतात. हे चित्र केवळ भारतातच नव्हे तर येथील मोठ्या शहरांमध्ये तसेच कोस्टल भागात अजूनही दिसून येते. त्यामुळे डोके गहाण ठेवून घराबाहेर पडून आपल्याबरोबरच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालण्याचे प्रकार इथेही दिसतात.