नगर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीनंतर महापालिका कामगार युनियन आक्रमक झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत, तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार असल्याची भूमिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जाहिर केली.
महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात संचारबंदी लागू असतानाही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दारू पिऊन फिरताहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्यामुळे सर्व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आरोपींच्या गुन्हेगारी रेकॉर्डही चांगला नाही. शहर अभियंत्यांवर बूटफेक प्रकरणातही हे आरोपी होते. पोलिसांकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
तसेच गुन्ह्यामध्ये कलम 144 चे उल्लंघन करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी गुन्हे वाढवावेत. महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करावी. कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत अत्यावश्यक सेवा बंदच राहतील, असा निर्णय युनियन घेतला असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही कर्मचारी खासगी रूग्णालयात उपचार घेत असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. महापालिका आयुक्त, उपायुक्त व सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. या घटना निषेधार्ह असून महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार : आयुक्त मायकलवार
करोनाचे सावट असल्याने अशा आपत्कालीन परिस्थितीत कामगार युनियनचा असा निर्णय योग्य नाही. यासंदर्भात कर्मचारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.