राहाता – शिस्त, संयम आणि एकजूट दाखवून आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा निर्धार करतानाच चांगल्या आरोग्याचा संकल्प माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुढीपाडव्याच्या निमिताने केला. तसेच आज लोणी गावात औषध फवारणीस प्रारंभ करण्यात आला.
गुढीपाडव्याचा सण साजरा करतानाच या नवीन संवत्सरात नव्या संकल्पाची गुढी उभारण्याची परंपरा आपल्याकडे आहे. यंदा मात्र करोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साध्या पद्धतीने हा सण साजरा होत आहे. माजी मंत्री आ. विखे पाटील यांनी आपल्या निवासस्थानी परिवारा समवेत गुढी उभारून साधेपणाने सण साजरा केला.
करोनाचे गांभीर्य समोर आल्यानंतर आ. विखे पाटील यांनी प्राधान्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठविण्याची व्यवस्था केली. प्रवरा उद्योग समूहातील सर्वच संस्थांच्या कामकाजाबरोबरच आ. विखे पाटील यांनी स्वतःचे जनसंपर्क कार्यालयही बंद ठेवून ‘वर्क फ्रॉम होम’ला सुरुवात करून करोना व्हायरसच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत समाजातही माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. लोणी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात औषध फरवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली.
एकूण 15 फवारणी ट्रॅक्टरचा यासाठी उपयोग करण्यात आला. लोणी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांत एवढ्या मोठ्या प्रमाणात फवारणी करण्याचा ग्रामीण भागातील पहिला उपक्रम ठरला आहे. अन्य ग्रामपंचायतींनी देखील फवारणी करून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.