इथाईल अल्कोहोलचा पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश
शक्य असल्यास सॅनिटायझरचे उत्पादन करता येणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, सॅनिटायझर तयार करण्यासाठी आवश्यक इथाईल अल्कोहोल, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल व इथेनॉलचा वाजवी दरात पुरवठा करावा, असे निर्देश साखर आयुक्त सौरभ राव यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत.
केंद्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. त्यानंतर साखर आयुक्त राव यांनी हे आदेश राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत. शक्य असलेल्या कारखान्यांनी स्वतः सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्याचे या आदेशात म्हटले आहे. सध्या देशभरात सॅनिटायझर तुटवडा जाणवत आहे. सॅनिटायझर तयार करण्यासाठी आवश्यक असलेले इथेनॉल अल्कोहोल, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल व इथेनॉल ही उत्पादने विविध साखर कारखान्यांमध्ये तयार होतात.
त्यामुळे ही उत्पादने वाजवी दरात उपलब्ध झाल्यास, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य होणार आहे. ज्या सहकारी आणि खासगी कारखान्यामध्ये ही उत्पादने घेतली जातात, त्या सर्व कारखान्यांनी वरील उत्पादने विकताना 19 मार्च रोजी अत्यावश्यक वस्तू कायद्यातील झालेल्या बदलानुसार 5 मार्चच्या किमती लक्षात घेत, त्यानुसार विक्री करावी. अन्यथा अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई करण्याचा इशारा या साखर कारखान्यांना देण्यात आला आहे. याशिवाय ही उत्पादने त्वरित उपलब्ध करून द्यावीत.त्यांचा दर्जा व किंमत अत्यावश्यक कायद्यातील बदलनुसार राहतील, असे साखर आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
राज्यातील ज्या साखर कारखान्याकडे हे घटक उपलब्ध आहेत, त्यांनी शक्य असल्यास सॅनिटायझरची निर्मितीस प्राधान्य देत, ती तत्काळ सुरू करावी. आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांनी हॅंड सॅनिटायझर तयार करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, असे या आदेशात म्हटले आहे.
सॅनिटायझरची कमतरता दूर होण्याची शक्यता
आसवनी प्रकल्प असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना हॅंड सॅनिटायझरचे उत्पादन शक्य आहे. त्याकरिता आवश्यक सर्व इतर घटकदेखील उपलब्ध आहेत. कारखान्यांचा हा पुढाकार राज्यातील हॅंड सॅनिटायझरची कमतरता दूर करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आता हे कारखाने हे उत्पादन केव्हा सुरू करताहेत, यावर सर्व अवलंबून आहे.
सॅनिटायझरची कमतरता दूर होण्याची शक्यता
आसवनी प्रकल्प असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना हॅंड सॅनिटायझरचे उत्पादन शक्य आहे. त्याकरिता आवश्यक सर्व इतर घटकदेखील उपलब्ध आहेत. कारखान्यांचा हा पुढाकार राज्यातील हॅंड सॅनिटायझरची कमतरता दूर करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आता हे कारखाने हे उत्पादन केव्हा सुरू करताहेत, यावर सर्व अवलंबून आहे.