पुणे : पुण्यातील बी. जे. महाविद्यालयात उद्यापासून कोरोना चाचणी घेण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील केईएम आणि कस्तूरबा रुग्णालयातही चाचणी केंद्रे उद्यापासून सुरू करण्यात येतील. येत्या चार आठ दिवसांत आणखी पाच अशी आठ केंद्रे सुरू करण्यात येतील. तशी सुविधा संबंधित रुग्णालयात करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरोग्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन केंद्रास भेट दिली. तेथील प्रमुख वर्षा पोतदार आणि एस. एस. अब्राहम यांच्याशी चर्चा करण्यात आली. तेथूनच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी चार्च केली. त्यांनी चाचणीसाठी लागणाऱ्या किटची उपलब्धता करून देऊ, असे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राच्या काही परवानगी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे प्रलंबित असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तातडीने संबंधितांशी बोलून परवानगीबाबतचे प्रश्न मार्गी लावले असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे चाचणी केंद्र सुरू करण्यास परवानगी िंमळाली असून तेथे एनआयव्ही आणि आयसीएमआर यांच्या मदतीने चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. दोन ते चार दिवसांत हेही केंद्र सुरू करण्यात येईल. याचबरोबर औरंगाबाद, मीरज, धुळे येथील सरकारी महाविद्यालयाच्या लॅबोरेटरीजमध्ये ही सुविधा येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्तालयात निम्मे कर्मचारी
सरकारी कार्यालयांचे कामकाज निम्म्या कर्मचाऱ्यांत चालू शकते का? याची चाचपणी केली. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयात निम्मे कर्मचारी कार्यालयात येत आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. पीएमपीएमएलच्या रुटस्ची संख्या कमी केली आहे. यामागे उद्देश हा गर्दी टाळणे हा आहे.
राज्यात 42 रुग्ण
पिंपरीत 10, पुण्यात 8, मुंबईत 8, नागपुरात चार, नवी मुंबई तीन, कल्याण दोन, यवतमाळ तीन, तसेच रायगड, ठाणे, नगर आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी एक असे 42 रुग्ण आढळले आहेत.