कराची – ऑस्ट्रेलियाचा नवोदित धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन याने पाकिस्तान सुपर लीग टी-20 स्पर्धेत लाहोर कलंदर्स संघाकडून खेळताना मुलतान सुलतान्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतकी खेळी केली. लिनने 55 चेंडूत 12 चौकार व तब्बल 8 षटकारांची आतषबाजी करत 113 धावांची खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला. करोनाच्या भीतीमुळे लिनने मायदेशी परतण्याचा निर्णय देखील घेतला असून लवकरच तो पाकिस्तान सोडेल.
या सामन्यात खुशदिल शाहच्या नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर मुलतान सुलतान्स संघाने 20 षटकात 187 धावा केल्या. विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना लाहोर संघाने 18.5 षटकात केवळ 1 गडी गमावून विजय मिळविला. या विजयासह लाहोर संघाने स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आहे.
लाहोर संघाच्या फखर झमानने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मात्र लिनने मुलतान्स संघाच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला.