मुंबई : धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या “कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन एकबोटे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर एकबोटेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत केले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असे देखील एकबोटे यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम 24 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
मिलिंद एकबोटे म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांचे वढू बुद्रूक हे समाधीस्थान आहे. त्याठिकाणी 24 मार्चला संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावे आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो, असे मिलिंद एकबोटे यांनी स्पष्ट केले.