निलेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
मुंबई : अयोध्या भेटीवर गेले असताना मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली होती. त्यांच्या या देणगीवर माजी खसदार निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.
मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी खर्च केले. मात्र, राम मंदिरासाठी फक्त 1 कोटी दिले. याचं तुम्हाला कसं काहीच वाटत नाही, असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
निलेश राणे यांनी या आधीही शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुंबईतल्या जीजामाता उद्यानात मुंबई महापालिकेने पेंग्विन आणले होते. त्यासाठी 45 कोटींचा खर्च आला होता.
त्यावरून वादही झाले होते. त्याच विषयाचा संदर्भ घेऊन निलेश राणे यांनी ही टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत रामल्लांचे दर्शन घेतले होते.
यावेळी त्यांनी अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.