मुंबई, नवी दिल्ली : येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांची मनी लॉड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकले. राणा कपूर यांच्या शिवाय त्यांची कन्या रेखा कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांचीही चौकशी करण्यात आली.
दिवाण हौसिंग फायनानन्स कॉर्पोरेशनने (डीएचएफएल) एका गृहनिर्माण प्रकल्पास 600 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्या प्रकल्पावर राणा कपूर कुटुंबियांचे नियंत्रण आहे. या व्यवहाराशिवाय राणा कपूर यांच्या पाच हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी सुरु आहे. या व्यवहारांमध्ये कपूर कुटुंबियांची सध्या आणि यापुर्वी मालकी असणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. तर डीएचएफएल प्रवर्तक आणि संचालक असणाऱ्या काही कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
राणा कफूर यांची चौकशी सुरूच
अंमलबजावणी संचनालयाने येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी शनिवारी सुरू ठेवली. शनिवारी दुपारी त्यांना संचनालयाच्या बलार्ड इस्टेट येथील कार्यालयात आणण्यात आले. तत्पुर्वी शुक्रवारी रात्री अंमलबजावणी संचनालयाने राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या बंगल्याचर शुक्रवारी रात्री छापा टाकला. त्यावेळीही त्यांची चौकशी करण्यात आली.
ईडीची ही कारवाई येस बॅंकेवर गुरूवारी केलेल्या कारवाईनंतर लगोलग करण्यात आली. येस बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून केवळ 50 हजार रूपये काढण्याचे निर्बंध लादण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेच्या पुनर्वसनाच्या आराखड्यानुसार स्टेट बॅंकेने येस बॅंकेतील 49 टक्के शेअर्स घेण्याचे मान्य केले आहे.