कोलकाता – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काल कोलकाता येथे झालेल्या सभेच्यावेळी गोली मारोच्या आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या या घोषणा या दखल पात्र गुन्हा असल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणात एका व्यक्तीने न्यु मार्केट पोलिस ठाण्यात रविवारीच तक्रार दाखल केली होती. त्यानुसार काल रात्रीच या तीन भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. अमित शहा यांच्या रॅलीच्यावेळी देश के गद्दारोंको गोली मारो सालोंको अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तथापी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्याचा इन्कार केला आहे. तृणमुलच्याच काहीं कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिल्लीत अशाच स्वरूपाच्या घोषणांमुळे तेथील वातावरण खराब होऊन तेथे दंगली झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा हे काल एक दिवसाच्या कोलकाता भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मध्य कोलकाता भागात एका सभेचे आयोजन केले होते. तेथे सभेला येताना कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष सभेच्यावेळीही अशाच घोषणा दिल्या गेल्याचा काहींचा दावा आहे.