दिल्ली दंगलीच्या प्रकरणात विरोधकांचा सरकारवर एकजुटीने हल्लाबोल

नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणात सर्वच विरोधकांनी आज राज्यसभेत केंद्र सरकारवर व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर संघटीतपणे हल्लाबोल केला. कॉंग्रेस, डावे पक्ष, तृणमुल कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी हा हल्लाबोल केला.

त्यांनी या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली पण ती अध्यक्ष नायडू यांनी अमान्य केली. ते म्हणाले की हा विषय महत्वाचा आहेच पण आधी दिल्लीतील परिस्थिती सुरळीत करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यावर चर्चा करता येऊ शकेल. पण विरोधकांनी गदारोळ करीत दिल्लीतील स्थिती हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशाबद्दल मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही काहीं सदस्यांनी केली.

अध्यक्षांनी त्यांच्या चर्चेच्या मागणीचा विषय नाकारल्यानंतर विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करावे लागले. यावेळी तृणमुल कॉंग्रेसचे सदस्य डोळ्यावर काळी पट्टी बांधून सभागृहात आले होते. अनेक पक्षांनी या विषयावरून तहकुबी सुचना अध्यक्षांना सादर केल्या होत्या. पण त्यावर नंतर विचार करण्याची आश्‍वासन अध्यक्षांनी दिले. त्यातून विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे गदारोळ कायमच राहिल्याने अध्यक्षांना कामकाज तहकुब करावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.