नवी दिल्ली – दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला आरोपी पवन गुप्ता याची शिक्षेच्या विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने आज फेटाळून लावली. त्याला अन्य आरोपींसह उद्या मंगळवारी फाशी दिली जाणार आहे. त्याच्या आधी त्याने सुप्रिम कोर्टात अर्ज करून आपल्या शिक्षेला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली होती.
त्याच्या याचिकेची पाच न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे ईन चेंबर पद्धतीने सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी पवन गुप्ताची याचिका व स्थगितीची मागणी फेटाळून लावली. पवन याने आपल्या क्युरिटीव्ही पिटीशन द्वारे आपली फाशीची शिक्षा जन्मठेपत परावर्तीत करावी अशी मागणी केली होती. निर्भया प्रकरणातील मुकेशकुमार, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा, आणि अक्षयकुमार या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण या आरोपींनी वेगवगळ्या कारणावरून स्वतंत्र याचिका दाखल करीत आपल्यावरील फाशी टाळण्याचा सतत प्रयत्न केला आहे.
या आरोपींना मंगळवारी फाशी देण्याचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. या आरोपींपैकी तिघांनी राष्ट्रपतींकडे केलेल्या दयेच्या याचिका या आधीच फेटाळण्यात आल्या आहेत. तथापी पवन याने अजून राष्ट्रतींकडे दयेचा अर्ज केलेला नाही. ज्या तिघांचे दयेचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत त्यातील दोघांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. त्या फेटाळण्यात आल्या आहेत. पण अजून त्यातील एकाने अशी आव्हान याचिका दाखल केलेली नाही.