प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची मागणी
पिंपरी – महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अपंग विकास योजनेसाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून समीर घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रतिवर्ष 22 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र गेल्या वर्षभरात त्यांनी कोणीही अपंगासाठी योजना अथवा उपक्रम राबविला नाही. त्यामुळे या सल्लागारावर होणारी अर्थिक उधळपट्टी थांबवावी तसेच त्यांना देण्यात येणारे मानधन तात्काळ थांबवावे अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे करण्यात आली आहे.
तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, महिलाध्यक्ष संगीता जोशी यांनी निवेदन दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अंपग विकास योजना राबविण्यात येते. त्यासाठी समीर घोष यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एक वर्षभरात त्यांना मानधन आणि अन्य कामासाठी सुमारे 22 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र गेल्या वर्षभरात अपंगांच्या विकासासाठी त्यांनी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. तसेच नवीन कुठल्याही उपक्रमाची सुरुवात करण्यात आली नाही.
महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या अपंगांच्या आयुष्यात कुठलाही गुणात्मक फरक करणारी योजना किंवा प्रकल्प समीर घोष यांनी सुचविला नाही. अपंगांच्या विकासाच्या हेतूने महापालिकेतर्फे अपंग कल्याण समिती स्थापन केली आहे. या समितीच्या एकाही बैठकीला समीर घोष उपस्थित नसतात. तरीही त्यांना वर्षभरासाठी 22 लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. अपंगांच्या नावाखाली त्यांनी स्वत:चे मात्र कोटकल्याण करून घेतले आहे.
गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य
एखाद्या सल्लागाराचे पोट भरण्यासाठी हजारो अपंगांच्या कल्याण निधीतून लाखो रुपये काढून देणे हे महापालिका प्रशासनाचे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. अपंग विकास निधीची लूट थांबवावी, समीर घोष यांना मुदतवाढ देऊ नये तसेच त्यांना देण्यात आलेले मानधन वसूल करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.