प्रशासनाचे वेळकाढू धोरण; डागडुजी करण्याची ग्रामस्थांची मागणी
रघुनाथ थोरात
चाफळ -येथील पशुवैद्यकीय दवाखाना तसेच कृत्रीम रेतन उपकेंद्र इमारतीची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या विभागातील ग्रामस्थांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तसेच कवी यशवंत यांची जन्मभूमी आणि दास वास्तव्याने पावन झालेल्या या चाफळ भूमीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीची दुरवस्था होणे ही खूप मोठी शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या इमारतीला सध्या घरघर लागली असून त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. या पशुवैद्यकीय दवाखाना कार्यक्षेत्रामध्ये चाफळ विभागातील जवळपास दहा गावे आणि डोंगर माथ्यावरील 75 छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्या आहेत.
एवढे मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची ही दयनीय अवस्था म्हणजे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. ह्या इमारतीकडे प्रशासनाचे आजपर्यंत लक्ष का गेले नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांना तडे गेले असून फरशी पण तुटलेली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. भिंतींना बहुतांश ठिकाणी तडे गेले आहेत.
इमारतीच्या पाठीमागील भागात असलेल्या शौचालयाचा तसेच शेजारील खोलीचा दरवाजा मोडकळीस आल्याने दयनीय अवस्था झालेली आहे. पाठीमागील भागातील कट्ट्यावरील पायऱ्या आणि सभोवतालची फरशी जागोजागी तुटून पडली आहे. अस्वच्छतेमुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. औषधे वापरून रिकाम्या झालेल्या टाकाऊ वैद्यकीय वस्तूंचा ठिकठिकाणी खच पडल्याने येथे कार्यरत असलेल्या पशुधन विकास अधिकारी यांचा वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापनाविषयी हलगर्जीपणा दिसून येतो.
एकंदरीत अशा सर्व गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
“पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीला लागलेली घरघर पाहून मन सुन्न होते. प्रशासनाने या इमारतीबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन परिसरातील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.”
अजय डांगे ,पशुपालक शेतकरी दाढोली
“चाफळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीची दुरवस्था झाली असून जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित डागडुजी करावी अशी आमची मागणी आहे.”
पंडित पाटील ,धायटी