भारताच्या हिताला बाधा पोहचवून अमेरिकी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा उद्देश असल्याचा आरोप
भुवनेश्वर : डाव्या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या हिताला बाधा पोहचवून अमेरिकी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ट्रम्प येत असल्याचा आरोप माकपने केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प प्रथमच भारतात येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी 24 आणि 25 फेब्रुवारी या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. ट्रम्प दिल्लीला जावोत किंवा गुजरातला; माकपचे कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करतील.
त्यामागे दोन कारणे आहेत. जम्मू-काश्मीर, नागरिकत्व दुरूस्ती कायदा यांसारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा पाठिंबा हवा आहे. त्याबदल्यात भारताने आपल्यासाठी अर्थव्यवस्था पूर्ण खुली करावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. त्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे आणि मोदी त्यापुढे झुकत आहेत. ती घडामोड भारताच्या हिताची नाही.
आमच्या प्रस्तावित निदर्शनांमागील ते पहिले कारण आहे. दुसरे म्हणजे, अमेरिकी लष्करी सामग्रीच्या खरेदीसाठी आपण प्रचंड खर्च करणार आहोत. आपली स्वत:ची अर्थव्यवस्था धोक्यात आणून आपण अमेरिकी अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत, असे येचुरी यांनी म्हटले.