आरोपी व पतीविरुद्ध गुन्हा दाखल : कात्रज परिसरातील प्रकार
पुणे – पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार कात्रज परिसरात समोर आला. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी व पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित होस्टेलमध्ये राहात असताना त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केला. जेव्हा तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला, तेव्हा “मीच त्याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे पतीचे उत्तर ऐकून तिला धक्का बसला. सुरेश शैशराज शिंदे (रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
ही घटना कात्रज परिसरातील एका होस्टेलवर नोव्हेंबरमध्ये घडली. ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर कामानिमित्त वास्तव्यास होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्याच्या उत्तराने पत्नीला धक्का बसला. शेवटी तिने नातेवाईकांशी बोलल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून शिंदे याला अटक केली.