लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे पुढाकार संरक्षण मंत्रालय आणि वैद्यकीय परिषदेची परवानगी
पुणे -“वाढते विषाणूजन्य आजार, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांची दखल घेत, लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे देशात दहा नवीन विषाणू संशोधन प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालय आणि वैद्यकीय परिषदेची परवानगी मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरूवात होणार आहे,’ अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनूप बॅनर्जी यांनी दिली.
पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमप्रसंगी बॅनर्जी बोलत होते. ते म्हणाले, “जैविक हल्ले तसेच विविध विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव पाहता, अशा विषाणूंबाबत वेळीच संशोधन गरजेचे आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे. या प्रयोगशाळा तीन स्तरावर असतील. यामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक स्तरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे वेळीच विषाणू संशोधन आणि त्यावरील उपाय यासाठी मोलाचा हातभार लागणार आहे.
दरम्यान, भारतात सध्या दोन सर्वोच्च विषाणू संशोधन संस्था आहेत. यापैकी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुण्यात, तर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ही संस्था दिल्ली येथे आहे. तेथे तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांचे प्रमाण अत्याधिक असल्याने या संस्थांवर अतिरिक्त ताण पडत असून, अनेकदा तपासणीमध्ये उशीर होत असल्याने, रोग निदानात विलंब होतो. या पार्श्वभूमीवर लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे उभारण्यात येणाऱ्या या प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यातून उपरोक्त दोन्ही संस्थांवरील ताण हलका होणार आहे. या नवीन संस्था तातडीने मार्गी लागल्या जातील, यासाठी प्रयत्न केले जातील.’
टेलिमेडिसीनद्वारे औषधोपचार
युद्धभूमीवर अथवा समुद्रात दीर्घावधीसाठी तैनात असणाऱ्या युद्धनौका, पाणबुडीवर कार्यरत असणाऱ्या सैन्यांसाठी आता टेलिमेडिसीनद्वारे औषधोपचार सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्यमातून अल्पावधीत सैन्य दलाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळत असल्याचे बॅनर्जी म्हणाले.
“गगनयान’साठी वैद्यकीय प्रशिक्षण
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असलेल्या गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची नियुक्ती निश्चित झाली आहे. यात सहभागी अंतराळवीरांना आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचे काम लष्करी वैद्यकीय सेवेकडून सुरू आहे. अंतराळातील राहण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधादेखील पुरवणार असल्याचे लेफ्टनंट जनरल अनूप बॅनर्जी म्हणाले.