वेलिंग्टन : भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांची बडबड अद्याप बंद झालेली नाही. रवींद्र जडेजा, हर्षा भोगले व सचिन तेंडुलकरबाबत बरगळल्याने यापूर्वी टीकेचे धनी बनलेल्या मांजरेकरांना सध्या नेटकरी जास्तच ट्रोल करत आहेत.
न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत खेळाडूंनी कशी कामगिरी करावी यावर तारे तोडणा-या मांजरेकरांना तुम्ही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू नका अन्यथा संघाची आणखी (कु) प्रगती होईल, असे टोमणे सध्या मांजरेकरांना मिळत आहेत.
Watched that super over from Bumrah. He is such a fabulous bowler but he could use the crease a little more to create different delivery angles. #INDvsNZ
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 30, 2020
न्यूंझीलंडविरूध्दच्या तिस-या टी-२० सामन्यात बुमराहने एकही बळी न घेता ४५ धावा दिल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्येही बुमराहच्या एका षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १७ धावा केल्या. मांजरेकर यांनी सामना संपल्यानंतर बुमराहला ट्विटरवरून गोलंदाजीबाबत काही सल्ले दिले. मात्र बुमराहला सल्ला देणे मांजरेकरांना महागात पडलं. नेटक-यांनी मांजरेकरांची खिल्ली उडवली.
तुमची मते फारच गंमतीशीर असतात, अनेक खेळाडूंबाबत पराकोटीची टीका करता मात्र तुमची मते वाचून आमची खूप करमणूक होते. हा प्रकार समालोचनापुरताच मर्यादित ठेवा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कधीही अर्ज करू नका, अशा शब्दात त्यांना नेटक-यांनी ट्रोल केले आहे.