सासवड – येथील तलाठी कार्यालय सासवड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट या व्यापारी संकुलात 67 क्रमांकाच्या गाळ्यात वीस वर्षांपासून बेकायदेशीररीत्या सुरू आहे. या बदल्यात सासवड नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नसल्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हे कार्यालय त्वरीत खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
एका शासकीय कार्यालयाने अशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासोबत सासवड शहरातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली होती. यावेळी त्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरच असलेली अतिक्रमणे काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा पाचारण केला होता.
छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर गाळे पुरविण्यासाठी व त्यातून उत्पन्न मिळण्याच्या हेतूने सासवड नगरपालिकेने उभे केले असून, याठिकाणी गाळा घेण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब केला जातो. तलाठी कार्यालयासाठी दिल्या गेलेल्या गाळ्यांचा लिलाव पद्धतीने व कायदेशीर ताबा घेणे आवश्यक असताना कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता न करता या ठिकाणी तलाठी कार्यालय थाटण्यात आले आहे.
या तलाठी कार्यालयाची जुनी जागा सध्या मोकळी आहे. या ठिकाणी असणारी जुनी इमारत पडून वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी तहसील कार्यालय आहे. सासवड नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील शासकीय गाळ्यांमध्ये अशा पद्धतीने अनधिकृतपणे एक शासकीय कार्यालय थाटले जाते, या बाबतीत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केली जात नाही.
या सोबतच या शासकीय कार्यालयाकडून एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळत नसताना अशा प्रकारचे बेकायदेशीररीत्या केल्या जणाऱ्या अतिक्रमणाबाबत नगरपालिका काय कारवाई करणार, असा प्रश्न आता येथील परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक 67 हा सासवडच्या तलाठी कार्यालयासाठी सासवड नगरपालिकेला कोणताही मोबदला न देता वापरला जात आहे, असे निदर्शनास आल्यानंतर सासवड नगरपालिकेने त्यांना कार्यालय वापरासाठी गाळा घेतला त्या दिनांकापासून आजपर्यंत प्रचलित दराने भाडे द्यावे अथवा भाडे न दिल्यास त्वरीत गाळा खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
– विनोद जळक, मुख्याधिकारी सासवड नगरपालिका.
सासवड येथील तलाठी कार्यालय असलेल्या गाळ्याबाबत सासवड नगरपालिकेने नोटीस पाठविली आहे. ती नोटीस आम्हाला मिळाली आहे. या गाळ्याबाबत तहसीलदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
-बी. एस. ढमढेरे, तलाठी, सासवड.
सासवड नगरपालिकेने तलाठी कार्यालयास पाठवलेल्या नोटिसीबाबत मला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. याबाबत सासवडचे तलाठी बी. एस. ढमढेरे यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
– राजाराम भामे, मंडल अधिकारी, सासवड.
सासवड येथील तलाठी कार्यालयाबाबत संबंधित प्रकरणाची तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून माहिती घेऊन याबाबत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-पी. आर. गायकवाड, प्रांत अधिकारी, पुरंदर.