करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी

पुणे – चीनमधून पुण्यात आलेल्या करोना विषाणूबाधित पाचही संशयितांचे प्रयोगशाळेतील नमुने निगेटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्‍तींवर महापालिकेच्या नायडू रुग्णालयात डॉक्‍टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात एकूण 12 रुग्णांना विलगीकरण कक्षात भरती केले असून, करोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य संचालक (पुणे) डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

करोना विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. चीनमधील वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणारा हा विद्यार्थी केरळमधील विलगीकरण कक्षात भरती असून त्याची प्रकृती स्थिर आहे. करोना बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील 21 विमानतळांवर सुरू केले आहे. 30 जानेवारी 2020 पर्यंत मुंबई विमानतळावर 5,128 प्रवाशांचे स्क्रिनिंग केले आहे.

करोना संदर्भात मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 104 

विमानतळावरील स्क्रिनिंग आणि क्षेत्रिय पातळीवरील सर्वेक्षण यातून बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील 36 प्रवासी आढळले आहेत. यापैकी एकूण 12 प्रवाशांना सौम्य सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्याने विलगीकरण कक्षात भरती केले आहे. राज्यात 12 संशयित रुग्णांपैकी 5 मुंबईचे, 5 पुणे शहरातील, 1 नागपूर आणि 1 जण नांदेड येथील आहे. त्यापैकी 8 प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे “एन.आय.व्ही’ने कळविले आहे. तर मुंबईतील ज्या दाखल व्यक्‍तींचा दुसरा प्रयोगशाळा नमुनाही निगेटिव्ह आला आहे.

“त्या’ विद्यार्थ्यांची माहितीच नाही..
चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेले सुमारे 700 विद्यार्थी आहेत. त्यापैकी पुण्यातील किती विद्यार्थी आहेत याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाही. तसेच केंद्र सरकारने त्याबाबत अद्याप काही कळविले नसल्याचे महापालिकेतील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यातील नायडू रुग्णालयात भरती केलेल्या पाचही व्यक्‍तींचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. चीनमधून राज्यात आलेल्या व्यक्‍तींनी स्वत:हून पुण्यातील नायडू, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात जावून तपासणी करून घ्यावी. ज्या व्यक्‍तींना सर्दी, ताप, खोकला, घसा अशी लक्षणे आहेत. परंतु, ते चीनमधून आले नाही किंवा तेथून राज्यात आलेल्या व्यक्‍तींशी संपर्क आला नसेल तर त्या नागरिकांनी घाबरू नये. खबरदारी म्हणून औषधोपचार घेऊन घरी विश्रांती घ्यावी. हात स्वच्छ धुवूनच जेवण करावे. मांस खाताना शिजविलेले असावे यासह आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका

आरोग्यमंत्र्यांची पुण्यातील अधिकाऱ्यांशी बैठक
राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन करोना आजाराच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच, विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांबाबत माहिती घेऊन, खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात, आतापर्यंत काय नियोजन झाले याची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी 020-26127394 हा दूरध्वनी क्रमांक आहे. या आजाराच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.