पुणे – 19 फेब्रुवारीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीला “ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. आपल्या कार्याने जनमाणसांना स्फूर्ती देणारे महापुरुष सर्वच भारतीयांना वंदनीय आहेत. त्यामुळे महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी शासनाने “ड्राय डे’ जाहीर केले आहेत.
अठरापगड जातीच्या लोकांना सामावून घेत, स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना अभिमान आहे. या महापुरुषाची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. त्यादिवशीदेखील “ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी निवेदनात केली आहे. अध्यक्ष अक्षय सातपुते, अनिल चोंधे, बाळासाहेब शेडगे, अनिकेत शेडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.