संदीप राक्षे
सातारा – कधीतरी जगातील पेट्रोलचे साठे संपुष्टात येतील. मग दळणवळणं कसे होईल, या चिंतेचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. सातारा शहरातही प्रवाहापेक्षा वेगळं काही करणारा, सायकल बाइक्स आणि त्यात फ्युजन करणारा अवलिया, संशोधक म्हणा हवं तर. शुक्रवार पेठेतील शुभम गोसावी. कोटेश्वर पुलालगतच्या उजव्या हाताला दिसणाऱ्या दुमजली इमारतीत गोसावी कुटुंब राहते. त्याच इमारतीच्या पिछाडीला शुभमच्या संशोधनाची छाप असलेले छोटेसे वर्कशॉप आहे. शुभमने इलक्ट्रिक बाईक व सायकल बनवण्याचा संकल्प सोडून ते प्रकार तयारही केले.
शुभमची इलक्ट्रिक सायकल अनंत इंग्लिश स्कूलमधील इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनात प्रदर्शित झाली. तेव्हाच तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सायकलला सात ऍम्पिअरची बॅटरी असल्याने ही सायकल 15 किलोमीटर अंतर पार करू शकते. बॅटरीची क्षमता वाढवल्यास त्यापेक्षाही जास्त अंतर ती जाऊ शकते. दीड ऍम्पियरच्या चार्जरमध्ये बॅटरी पाऊण तासात फुल्ल चार्ज होते. ही इलेक्ट्रिक सायकल म्हणजे अगदी शुभम ब्रॅंड आहे. या सायकलच्या हॅंडलला इंडिकेटर सेन्सर व ब्रेकचे सेफ्टी फिचर लेड हेडलाइट, पास लाइट, हाय बीम ब्रेक लाईट, हेडलाइट इंडिकेटर हॉर्न अशा सुविधा आहेत. या सायकलची किंमत पंचवीस हजार आणि यातीलच सुधारीत व्हर्जनची किंमत पस्तीस हजार आहे. हौशी सातारकरांना अशा कस्टमाइज्ड इलक्ट्रिक सायकल शुभम बनवून देतो.
सायकलमध्ये पॅडल आणि बॅटरी अशी हायब्रीड सुविधाही आहे. कच्च्या आणि कठीण चढाच्या रस्त्यावर ही सायकल सहजपणे प्रवास करते, असा शुभमचा दावा आहे. सायकलला पाच स्पीड गियर देण्यात आल्याने तिला आपोआप गती मिळत जाते. मोटार मॅन्युअल पॉवर वापरल्यास सायकलची गती प्रति तास पन्नास किलोमीटर होते, असे शुभम सांगतो. सायकलच्या अधिक सुरक्षिततेसाठी त्याने मागील चाकाला डिस्क ब्रेक दिला आहे. तो ब्रेक दाबल्यास वीज पुरवठा खंडित होऊन सायकल आपोआप थांबते. इलक्ट्रिक बाइकवरही शुभमचे संशोधन सुरू आहे. चाळीस किलोमीटर जाणाऱ्या इलक्ट्रिक बाइकचा वीज खर्च केवळ दहा रुपये असल्याचे शुभम सांगतो.
रोजचे बाइकचे रनिंग चाळीस किलोमीटर झाले तरी सत्तर रुपयांची बचत होते, असे शुभमचे कॅल्कुलेशन आहे. अनंत इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या शुभमने सातारा पॉलिटेक्निकमधून इलक्ट्रिक डिप्लोमा केला असून तो मुंबईच्या बी. आर. हर्णे महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला आहे. इलक्ट्रिक बाइक व सायकलच्या वेडाविषयी “प्रभात’शी संवाद साधताना आपल्याला इलक्ट्रिक गोष्टीची प्रचंड आवड असल्याचे शुभम गोसावीने सांगितले. पेट्रोलचे वाढते दर व पर्यावरणाचे वाढते नुकसान यावर उपाय म्हणून इलक्ट्रिक सायकल बनवली. पेट्रोल व इलक्ट्रिकचे हायब्रीड व्हर्जन बनवणार असल्याचे शुभम गोसावी याने सांगितले. ज्या युवा सातारकरांना कस्टमाइज्ड बाइकमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या सायकलसफरीचा अनुभव घ्यायलाच हवा.