पुणे-नाशिक महामार्ग यमराजाचे दार


रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर दिवसाआड अपघात होत असून त्यात अनेकांचा बळी गेला तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. चांडोली टोल नाका ते आळेफाटा या सुमारे 50 किलोमीटर अंतरात अपघाताच्या अनेक घटना घडत असून महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने अपघातांचा आलेख चढता आहे. दरम्यान, दोन महिन्यांत सुमारे 10 जणांचा बळी गेला असून 25 जण जायबंदी झाले आहेत.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडी, अरुंद रस्ता आणि अपघाताच्या बाबत क्रमांक एक बनला आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र राजगुरूनगर, खेड घाट, मंचर कळंब, नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची कामे मार्गी लागली नसून या गावांजवळ असलेले अरुंद रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या महामार्गावरील अरुंद पूलही मृत्यूचे सापळे बनले आहेत.

वर्षे बदलते तशीच वाहनांची संख्या वाढत चालली आहे रस्ता मात्र आहे तेवढाच आहे, शिवाय या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड, अवजड वाहने जा-ये करीत असल्याने अपघात आणि वाहनकोंडी नित्याची बनली आहे. चाकण, राजगुरूनगर येथील वाहतूक कोंडी प्रवाशांच्या पाचवीला पुजली आहे.

विकेंड आणि सणासुदीच्या दिवशी महामार्गावर असंख्य वाहने जा-ये करीत असल्याने वाहतूक कोंडी अन्‌ त्यात तास्‌तास अडकून बसणे ठरलेलेच असते त्यामुळे विकेंडला पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ प्रवाशांवर तर विकेंडच नको असे म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

नेत्यांसह प्रशासनाचे दुर्लक्षच
पुणे-नाशिक महामार्गावर सार्वाधिक अपघात राजगुरूनगर टोलनाक्‍यापासून खेड घाटापर्यंत झाले आहेत गेली दहा वर्षांत अनेक जणांचा बळी घेतला आहे. अरुंद रस्ते, त्याच्या साईडपट्ट्या खचलेल्या, मार्गावर खड्डे पडलेले, खेड घाटातील नागमोडी वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. राजगुरूनगर शहराजवळील चांडोली फाटा, पानमळा व खेड घाटात सर्वाधिक अपघात झाले आहेत. यामध्ये जीवित हानी तर झालीच शिवाय महागड्या गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत असताना पर्याय उपलब्धकरण्याकडे राजकीय नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
अपघातानंतरच होतात जागे
पुणे-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीचा महामार्ग अशी देशात ओळख निर्माण झाली आहे. मात्र केंद्र सरकार याकडे फारसे लक्ष देत नसल्याने प्रवासी, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. राजगुरूनगर जवळील खेड घाटाचे बाह्यवळणाचे काम अजूनही संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे जुन्याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे, या रस्त्याची क्षमता आणि जड- अवजड वाहनांची संख्या यात मोठी तफावत आहे. महामार्गावर राजगुरूनगर ते खेड घाट या अंतरात अनेकदा जीवघेणे खड्डे पडले अहेत; मात्र ते बुजवण्याचे कष्ट महामार्ग प्राधिकरण वेळेत घेत नाही. अपघात झाल्यानंतर ते जागे होते.
प्रश्‍न अजून तीन वर्षे सुटणार नाही
अरुंद रस्ता, जड-अवजड वाहने, बेशिस्त वाहनचालक, राजगुरूनगर शहरातील व भीमानदीवरील अरुंद पूल आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटत नसून तिच्यात वाढच होत चालली आहे. राजगुरूनगर शहर बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त मिळत नाही. या बाह्यवळणाचे संपादन झाले आहे;मात्र प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. टेंडर मागून टेंडर निघत आहेत पण प्रत्यक्षात कामच सुरु होत नसल्याने हा प्रश्‍न अजूनही किमान तीन वर्षे सुटणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.