करडे रस्त्याची दुरवस्था : खाचखळगेच नशिबी
निमोणे – करडे – कारेगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक होत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे अनेक कामगार याच रस्त्याने जातात. या खड्ड्यांमुळे अनेकवेळा गंभीर अपघात झाले आहेत. परंतु अजूनही बांधकाम खात्याने रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
करडे – कारेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईटपट्टया भरण्याचे काम 15 दिवसांपूर्वी केले होते. यावेळेस दोन्ही बाजूने मुरूम टाकून साईडपट्ट्या भरल्या आहेत. परंतु 15 दिवसांनंतर लगेचच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साईडपट्टयांचा मुरूम पूर्णपणे उखडला आहे.
त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. दोन्ही बाजूच्या साईडपट्टयांना टाकलेला मुरूम हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसत आहे. मुरूम टाकताना त्यावर योग्य प्रकारे पाणी मारून रोडरोलर न फिरवल्याने हा मुरूम लवकरच उखडला असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले.
त्यामुळे रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साईडपट्टयांचा मुरूम उखडल्याने समोरून चारचाकी वाहन आल्यास दुचाकी वाहनचालकांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते. त्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती निधीमधून या रस्त्याची दुरुस्ती केली आहे. यावर मुरूम टाकल्यानंतर पाणी मारून रोडरोलर फिरवलेला आहे. मी स्वतः जाऊन या रस्त्याची पाहणी करणार आहे.
-एम. आर. सोनवणे, सहायक अभियंता, बांधकाम विभाग.