वाहतूक पोलिसांच्या एनओसीची गरज नाही
पुणे – महापालिकेच्या विकासकामांसाठी रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या खोदाईच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची एनओसी घेण्याची गरज नसल्याचे आदेश माजी आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत पोलिसांकडून या एनओसीसाठी अडवणूक केली जात असल्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी तातडीने ही अट रद्द करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मावळचे आयुक्त राव यांनी 21 जानेवारीलाच याबाबतचे आदेश सर्व संबधित विभागांना दिले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या एनओसीसाठी रखडलेली अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
महापालिकेकडून रस्ते विकसन तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युतविषयक कामे केली जातात. ही कामे करताना तसेच रस्ते खोदताना वाहतूक वळविण्यात येते. तसेच, रस्त्याचा काही भाग बंद ठेवावा लागतो. त्यामुळे या कामांसाठी वाहतूक पोलिसांची एनओसी घ्यावी, अशी मागणी वाहतूक पोलीस उपायुक्तांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि शहर पोलिसांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत 30 मार्च 2016 रोजी ज्या भागात रस्ते विकसन तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युतविषयक कामे करायची आहेत तसेच ज्या भागात पूर्णत: रस्ते बंद करण्याची आवश्यकता आहे. त्या भागासाठी एनओसी घेऊनच कामे करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ही प्रक्रिया एनओसी घेण्याची प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या एनओसी वेळेत मिळत नसल्याने, काम वेळेत न सुरू होणे, वेगवेगळ्या टप्प्यावर मान्यतेसाठी विलंब होणे, कामे मुदतीत पूर्ण न होणे तसेच कामासाठी प्रस्तावित तरतूद खर्ची न पडणे, अशा अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्याचा फटका काम न झाल्याने सर्वसामान्यांनाही बसत होता. त्यामुळे 18 जानेवारीला झालेल्या मुख्य सभेत नगरसेवकांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ही अट रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण 14 कलम 203 अनुसार, महापालिकेच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक रस्ते दुरुस्त करणे, रुंदीकरण करणे, फेरफार करणे, सुधारणा करणे या सर्वांचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. त्यानुसार, कामासाठी रस्ता अशंत: बंद करणे तसेच बंद करण्याचे अधिकारही आयुक्तांना आहेत. या अधिकाराचा वापर करीत पोलिसांची एनओसी घेण्याची अट रद्द केली आहे.
पोलिसांना माहिती कळविण्याच्या सूचना…
पोलिसांची एनओसी रद्द करण्यात आली असली तरी पालिकेच्या कामामुळे शहरातील वाहतूक संचलनात अडथळे येऊ नयेत म्हणून अशा करण्यात येणाऱ्या कामाची संक्षिप्त माहिती संबधित पोलीस झोनला कळविण्यात यावी, खोदाईचे काम कसे असेल, वाहतूक नियोजन काय करणार, किती काळासाठी खोदाई करणार, सुरक्षेच्या काय उपाययोजना करतात याची लेखी माहिती पोलिसांना द्यायची आहे. तसेच ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात करायची आहे.