अनधिकृत बांधकामांवरील कारवाई होणार प्रभावी

महापालिका नेमणार 25 अभियंते : 6 महिन्यांच्या कराराने होणार नेमणूक

पुणे – शहरातील अनधिकृत बांधकामांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून 25 कनिष्ठ अभियंत्यांची फौज नेमण्यात येणार आहे. त्यासाठी 6 महिन्यांच्या कराराने या अभियंत्यांची नेमणूक केली जाणार असून त्यांच्याकडे शहरातील धोकादायक बांधकामे शोधणे आणि अनधिकृत बांधकामे शोधून त्यांच्यावर
कारवाई करण्याची जबाबदारी असणार आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शहरात सात झोन असून त्यांतर्गत सुमारे 29 कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तसेच, त्यांच्याकडेच अनधिकृत बांधकामांवर कारवाईचीही जबाबदारी आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेकडून परिणामकारक कारवाई होत नसल्याने अनेकदा न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर टीकाही केली आहे. मात्र, मर्यादीत कर्मचारी असल्याने बांधकाम विभागास ही कारवाई सक्षमपणे करता येत नाही.

अशी बांधकामे शोधणे, त्यांना नोटीस बजाविणे, त्यांच्यावर कारवाई करणे, वेळ प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणे यात पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठा वेळ द्यावा लागतो. परिणामी इतर कामे मागे पडतात. त्यावरून पुन्हा नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या रोषाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून 25 कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक 6 महिन्यांच्या कराराने केली जाणार आहे. या अभियंत्यांवर अशी बांधकामे शोधणे, त्यांना नोटीस बजाविणे, गुन्हे दाखल करण्याचे काम करणे या जबाबदाऱ्या असणार आहेत. तर त्यांच्यावर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे लक्ष असणार आहे.

पहिल्या दिवशी 25 जागांसाठी 700 ते 800 अर्ज
महापालिकेकडून काही दिवसांपूर्वीच याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, जाहिरात येताच पहिल्या दिवशी 25 जागांसाठी तब्बल 700 ते 800 अर्ज बांधकाम विभागाकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागही चक्रावला असून अवघ्या 6 महिन्यांसाठी नियुक्‍ती असतानाही मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने अधिकाऱ्यांनाही सुखद धक्‍का बसला आहे. त्यामुळे तातडीने आवश्‍यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करून अधिक प्रभावीपणे ही कारवाई केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.