पिंपरी – मॅकेनिकल इंजिनिअरला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, त्यासाठी त्याने जर्मन भाषा शिकण्याचा क्लास लावला होता. त्याच क्लासवरून परत येताना पीएमपीने धडक दिल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचे जर्मनीला जाण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. ही घटना भोसरी येथे शुक्रवारी (दि. 17) दुपारी घडली.
कार्तिक के. व्ही. (वय 25, रा. भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कार्तिक हा मूळचा केरळमधील आहे. मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतल्यावर तो कामासाठी दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात नोकरीसाठी आला. त्याचा एक मित्र जर्मनीमध्ये नोकरी करीत होता. त्याने कार्तिकला जर्मनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरला नोकरीच्या संधी असल्याचे सांगितले. मात्र त्यासाठी जर्मन भाषा येणे आवश्यक असल्याचेही सांगितले होते. जर्मनीत जाऊन करियर करण्यासाठी कार्तिकने पुण्यात जर्मन भाषेचा क्लास लावला. तर दुसरीकडे जर्मन कंपनीत नोकरीसाठी अर्जही केला होता.
पुण्यात जाण्या-येण्यासाठी बसप्रवासात वेळ जात असल्याने त्याने मित्राच्या मदतीने महिनाभरापूर्वी सेकंडहॅन्ड दुचाकी घेतली. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास याच दुचाकीवरून तो जर्मन क्लासवरून परत येत होता. लांडेवाडी भोसरी येथे भरधाव वेगात आलेल्या एमएच-12-आरएन-9075 या पीएमपीच्या बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरून खाली पडलेल्या कार्तिकच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.