नवी दिल्ली – येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुका ( Delhi Election 2020 ) पार पडणार असल्यानं कडाक्याची थंडी असलेल्या राजधानीतील राजकीय वातावरण मात्र कमालीचं तापलंय. अशातच आज भारतीय जनता पक्षातर्फे ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र भाजपतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने याबाबतची उत्कंठा कायम राहिली आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी व भाजपचे जेष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपच्या ५७ उमेदवारांची नावं जाहीर केली असून यामध्ये आम आदमी पक्षाचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भाजपने या यादीमध्ये ११ दलित उमेदवार, ४ महिला उमेदवार यांच्यासह माजी महापौर रवींदर गुप्ता आणि योगेंद्र चांडोलिया यांना देखील स्थान दिलं आहे.