पुणे: लष्कर परिसरातील विकासकामांसाठी आमदार निधीतून एक कोटी आणि खासदार निधीतून एक कोटी रूपये कन्टोन्मेंटला देण्यात येणार आहे. खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
कन्टोन्मेंट बोर्डाची ढासळती आर्थिक स्थिती पाहता, बापट यांनी आमदार सुनील कांबळे आणि खासदार बापट यांच्यातर्फे आमदार, खासदार निधीतून बोर्डाला एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बोर्डाला आता विकासकामांसाठी दोन कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे.
या निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची यादी लिखित स्वरूपात बोर्डाने द्यावी, त्यानुसार या निधीचे वाटप करण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले.
याबाबत बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमितकुमार यांना विचारले असता, ते म्हणाले,” लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून, आवश्यकतेनुसार कामांची प्राथमिकता ठरवली जाईल. त्यानंतर ती यादी खासदारांकडे पाठविण्यात येणार अाहे.”