पणजी – अरे भाऊ, आपापले पाहू अशी वृत्ती असलेल्या सध्याच्या काळात माणुसकीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. खेळाडू किती पैसे कमावतात आणि समाजासाठी काय करतात असे प्रश्नही विचारले जातात, मात्र सिक्कीमच्या इक्बाल अब्दुल्लाने माणुसकीच्या दर्शनातून प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गोव्याविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात अब्दुल्ला सराव करत असताना त्याचे लक्ष मैदानाच्या स्टॅण्डमध्ये असलेल्या लहान मुलाकडे गेले. तहानभुकेने व्याकूळ झालेल्या या मुलाला इक्बालने जवळ बोलावले व त्याला खाण्यासाठी ब्रेड व केळी दिली. त्याला आपल्या हाताने पाणीही पाजले. त्याच्या या कृतीचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. हे दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. उत्तर प्रदेशातील आझमगडचा इकबाल रणजी स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सिक्कीमकडून खेळत आहे. इक्बालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
For it is in giving that we receive.#innerpeace #iqqiabdullah #sia . pic.twitter.com/wqfh9Ady6v
— Iqbal abdullah (@iqqiabdullah) December 31, 2019
इक्बालने आयपीएलमधील कामगिरीने जाणकारांना प्रभावित केले असले तरीही त्याला अद्याप भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि कोलकाता संघाकडून खेळलेला आहे. आयपीएमध्ये 49 सामन्यांत इक्बालने 40 बळी घेतले आहेत. त्याने 63 प्रथम श्रेणी, 87 अ श्रेणी आणि 94 टी-20 सामने खेळले आहेत. इक्बालने प्रथम श्रेणीत 186, अ श्रेणीत 121 तर, टी-20 मध्ये 81 बळी मिळविले आहेत.