ठेवीवरील व्याजदरात केली कपात
पुणे – ज्येष्ठ नागरिक आयुष्यभर केलेल्या कमाईच्या ठेवीवरील व्याजदरावर अवलंबून असतात. मात्र, स्टेट बॅंकेने आता ग्राहकांच्या ठेवीवरील व्याजदरात कपात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्टेट बॅंकेने ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या माहितीनुसार, काही कालावधीच्या ठेवीवरील व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. दीर्घ मुदतीच्या 2 कोटी रुपयांच्या खालील ठेवीवरील व्याजदरात कपात करण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी 10 जानेवारीपासून होणार आहे. बॅंकेने 1 ते 10 वर्षे या कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.10 टक्के केला आहेत. 7 ते 45 दिवस कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर साडेचार टक्के तर, 46 ते 179 दिवस कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर साडेपाच टक्के ठरविला आहे. 180 ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर 5.80 टक्के ठरविला आहे. स्टेट बॅंक ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के जास्त व्याजदर उपलब्ध करते. त्यामुळे आता ज्येष्ठांना 1 ते 10 वर्षांच्या मुदतठेवीवर 6.60 टक्के व्याजदर मिळेल. याच महिन्यामध्ये स्टेट बॅंकेने आपल्या एमसीएलआर दरांमध्ये कपात केली होती.
…तर ठेवीवरील व्याजदरही
कमी करावे लागणार रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी आपल्या रेपो या व्याजदरांमध्ये 1.35 टक्क्यांची कपात करूनही व्यावसायिक बॅंकांनी आतापर्यंत आपल्या कर्जावरील व्याजदरामध्ये केवळ 0.45 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे बॅंकांनी व्याजदर कपात करावी, असे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सुचविले आहे. मात्र, बॅंका आपल्या भांडवलासाठी बऱ्याच प्रमाणात ठेवीदार अवलंबून असल्यामुळे बॅंकांना ठेवीवरील व्याजदरही कमी करावे लागणार आहेत, असे स्टेट बॅंकेने यापूर्वीच सांगितले आहे.