मायणी – एखाद्या मुलीवर अन्याय झाला तर बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रारी दाखल केल्या जात नाहीत. मात्र, अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती वाढल्यास समाजामध्ये अपप्रवृत्तींची वाढ होईल. त्यासाठी अन्याय सहन करु नका, तसे झाले तरच अन्याय करणारांना चाप बसेल.
परिस्थितीने अडचणी येत असतात मात्र त्यावर स्वतःच्या कर्तृत्वाने मात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. दहिवडी निर्भया पथक, वडूज व मायणी पोलीस विभाग तसेच भारतमाता विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज, मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक अशोक पाटील, उपनिरीक्षक शहाजी गोसावी, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, ऍड. जयश्री मोहने, डॉ. प्रियदर्शनी पवार, ऍड. विद्या उथळे, मायणी व परिसरातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सुमारे चार हजार मुली उपस्थित होत्या. तेजस्वी सातपुते म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांबरोबरच समाज व शिक्षण संस्थांनीही उचलणे गरजेचे आहे. मुलींच्या मनात स्वसंरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न व मनातील शंका मुलींना मोकळेपणाने विचारता याव्यात या हेतूने या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतःची क्षमता व इच्छा शक्तीच्या जोरावर मुलींनी विविध क्षेत्रात पुढे जाणे गरजेचे आहे. सुधाकर कुबेर म्हणाले, मायणी व परिसरात मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या परिसरातील मुलींना विविध प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. मुलींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून संस्था प्रयत्न करीत असते.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व स्तरावर पावले उचलली जाऊ लागली आहेत. मुलींना स्वसंरक्षणासाठी पोलीस विभागामार्फत हेल्पलाइन कार्ड तयार करण्यात आले असून या कार्डवर पोलीस विभाग व निर्भया पथकाचे संपर्क क्रमांक आहेत, त्याच्या माध्यमातून मुलींना अडचणीच्या वेळी आपल्या सुरक्षिततेसाठी या कार्डचा उपयोग होईल.
मायणी विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील मुलींना या कार्डचे वाटप करण्यात येईल. दरम्यान, यावेळी उपस्थित मुली व तेजस्वी सातपुते यांच्यामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलींनी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारले तसेच मुलींच्या प्रश्नांना तेजस्वी सातपुते यांनी उत्तरे दिली.