पुणे: सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. यात सायक्लोथॉनची फेरी अगदी दिमाखात पार पडली. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा डिजीटल प्रभात माध्यम प्रायोजक आहे.
हा उपक्रम सायकलॉर्बिट व सायकलॉजिस्ट, स्वच्छ सर्वेक्षण, पुणे सायकल प्लान, पुणे महानगरपालिका व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडो ऍथलेटिक सोसायटी ह्यांच्या सहयोगाने पार पडला. या उपक्रमात 8 वर्षांच्या चिमुरड्यांपासून 65 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला. सकाळी 6 वाजता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात 350 हून अधिक सहभागी स्पर्धकांनी सायकलिंगला सुरुवात करत सीओएपी मैदान, शिवाजीनगर येथून पाषाण चौकामार्गे सी. एस. बी. कॅन्टीनला वळसा घालून मैदानावर परत येत 15 किलोमीटर लांबीची परिक्रमा पूर्ण केली. या सायक्लोथॉनचा उद्देश समाजामध्ये सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबद्दल जागृती निर्माण करणे व सक्षम, निरोगी आणि प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी वाहतूकीचे मुख्य साधन म्हणून सायकल वापरण्याचा पायंडा पाडणे असा आहे.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, सहयोगी विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. धामणगावकर, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. भावीकट्टी आणि इंडो ऍथलेटिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमात सीओएपीच्या झेस्ट-20 अंतर्गत काम करणाऱ्या 150 हून अधिक स्वयंसेवक, समन्वयक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण सहभाग होता.