सोलापूरातील धक्कादायक घटना : शाळकरी मुलाचा गळा आवळून खून
सोलापूर : मित्राबरोबर बाहेर गेलेल्या शाळकरी मुलाचे मोबाईल अन् पैशासाठी खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या गावी घडला असुन, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अमीर अल्ताफ मुजावर (वय 14 रा. नान्नज ता. उत्तर सोलापूर) असे खुन झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमीर मुजावर हा दुसरा शनिवार असल्याने घरी होता. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र अरबाज अयुब शेख (वय 22 रा. नान्नज) हा घरी आला.
घराच्या छतावर दोघे बसुन कबुतर पाहत होते. काही वेळेनंतर दोघे तेथुन निघुन गेले. सायंकाळी 6.30 वाजता अमीर मुजावर याचे वडील घरी आले तेव्हां तो घरात नव्हता. वडीलांनी पत्नीकडे चौकशी केली असता तो अरबाजबरोबर गेला असल्याचे सांगितले.
अमीरच्या आईने त्याच्या मोबाईलवर फोन लावला असता तो बंद दाखवत होता. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अरबाज याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. अरबाज याने अमीरला दीड हजार रुपये उसने दिले होते, ते तो परत करत नव्हता.
मार्डी रोडवरील प्रशांत बचुटे यांच्या शेताजवळ दारू पाजुन गळा आवळला व डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणी वडील अल्ताफ नबीसाब मुजावर (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.