मावळात निराशा : आता बांधकाम सभापतिपदासाठी “फिल्डिंग’
अध्यक्षपदापासून मावळ तब्बल ५२ वर्षे वंचित
पिंपरी – भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला घड्याळाचा गजर झाला आणि मागील 25 वर्षांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळचे मैदान मारले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या 52 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आलेल्या संधीने शनिवारी (दि. 11) मावळ तालुक्याला हुलकावणी दिली. त्यामुळे मावळवासियांमध्ये नाराजीचा सूर पाहवयास मिळाला असला तरी आता बांधकाम समिती सभापतिपदासाठी “फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. हे पद तरी मावळच्या पदरात पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला आमदार म्हणून सुनील शेळके यांनी मावळात विजयी पताका फडकविली. विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आणि कधी नव्हे ती मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य शर्यतीत आले. या वेळी मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळेल, असे आडाखे बांधले गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या टाकवे-वडेश्वर गटाच्या सदस्या शोभा कदम यांना संधी मिळेल, अशी खात्री मावळवासियांना होती. मात्र शनिवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षश्रेष्ठींनी खेड तालुक्याला संधी दिली आणि मावळच्या पदरी पुन्हा निराशा आली, हे लपून राहिलेले नाही.
विधानसभेला गेल्या 25 वर्षांनंतर 2019 मध्ये पहिल्यांदाच सत्तांतर झाले. ऐनवेळी हातावर घड्याळ बांधून सुनील शेळके यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीच्या तिकीटावर स्वार होत पूर्वश्रमीचे सहकारी भाजपचे तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यामुळे मावळ राष्ट्रवादीमध्ये आलेली मरगळ दूर झाली. विधानसभा निवडणुकीतील यशाची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मावळला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देतील, अशी स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचंड आशा होती. मात्र या आशेवर पाणी फिरले. जिल्हा परिषदेवर पूर्वीपासूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिलेला दिसतो. 1997 मध्ये दिलीप टाटिया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते; तर गेल्या पंचवार्षिकमध्ये अतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती होते. पुणे जिल्हा परिषदेच्या गेल्या 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही, हे तितकेच खरे आहे.
दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर इच्छुक सदस्यांनी आपला मोर्चा बांधकाम समितीचे सभापतीपद मिळविण्यासाठी वळविला आहे. त्यामुळे मावळ बांधकाम समितीचे सभापतिपद मिळेल, अशी आशा दिसून लागली आहे.
आता विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून 18 महिला सदस्य इच्छुक होते. मावळ तालुक्यातील टाकवे-वडेश्वर गटाच्या सदस्या शोभा कदम यांचे नाव आघाडीवर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतींचा फॉर्म्युला वापरत निवडीची नवी प्रक्रिया राबविली. त्यानंतर पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम ठरविला गेला. आता 18 महिला सदस्यांमध्ये शोभा कदम या शर्यतीत असल्या तरी अखेरच्या क्षणी खेड तालुक्याने बाजी मारली. अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाचे खाते अर्थात बांधकाम समितीच्या सभापतीपदाकरिता सर्वच धडपड करीत असले तरी मावळला संधी मिळेल, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.