जामखेड – जामखेड नगरपरिषदेत भाजपची सत्ता असल्याने तेथे पडून असलेले फॉग मशिन न वापरता, आ. रोहित पवार यांनी बारामती ऍग्रोचे दोन फॉग मशिन आणून जामखेड शहरात आरोग्यदायी वातावरण करण्यासाठी धूर फवारणी मोहीम आजपासून सुरू केल्याचे सांगितले.
शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तसेच अस्वच्छता व साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्यामुळे थंडी-तापेच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. दरम्यान नगरपरिषदेत धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी आ. पवार यांच्याकडे केली. आ. पवार यांनी नगरपरिषदेकडे मागणी न करता बारामती ऍग्रोचे दोन फॉग मशिन तीनचाकी वाहनासह आणून शहरात धूर फवारणी मोहिमेस प्रारंभ केला. ग्रामीण रुग्णालयात आ. पवार यांच्या हस्ते फॉग मशिनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र कोठारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे,आरोग्याधिकारी डॉ. सुनील बोराडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात उपस्थित होते.