27 दुचाकी हस्तगत; गाड्यांचे नंबरही टाकले बनावट
सातारा – येथील कणसे होंडा शोरूममधील तब्बल 44 नव्या दुचाकी परस्पर विकल्याच्या प्रकरणी शशिकांत चांगदेव नलवडे (रा. धनगरवाडी, पो. कोडोली, सातारा) या कामगाराला शहर पोलीस ठाण्याच्या “डीबी’ने अटक करून त्याच्याकडून 27 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कणसे होंडा शोरूममध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी शशिकांत नलवडे हा काम करत होता. शोरूममध्ये गाड्या खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना भेटून तो कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करत होता.
गोदामातील गाड्या फायनान्स कंपनीने जप्त केल्याचे सांगत तो निम्म्या किमतीत नागरिकांना विकत होता. दरम्यान, शोरूममध्ये गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी एक युवक शुक्रवारी (दि.27) आला. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या कागदपत्र आणि चेसी नंबरवरून शोरूममधील कर्मचाऱ्यांना शंका आली. “तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली’, असे कर्मचाऱ्यांनी विचारता त्या नागरिकाने नलवडेचे नाव सांगितले.
त्यानंतर शोरूममधील व्यवस्थापकांनी गोदामातील गाड्या मोजल्या असता 44 गाड्या नसल्याचे समोर आले. आपल्याच कामगाराने मोठी अपरातफर केली असल्याचे समजताच शोरूममध्ये मोठी खळबळ उडाली. त्यानंतर शोरूमचे व्यवस्थापक संग्राम संभाजीराव माने (रा. गोडोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या “डीबी’ पथकाने बावडा (जि. कोल्हापूर)या ठिकाणी सापळा लावून अटक केली. चौकशी केली असता गाड्या विकल्याची कबुली त्याने दिली. त्याने विकलेल्या 44 गाड्यांपैकी 27 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. संशयिताला न्यायालयात हजार केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक फौजदार दशरथ कदम, हवालदार शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी केली.
एकाच नंबरच्या अनेक गाड्या
संशयिताने शोरुममधील 44 गाड्या विकताना त्याने रस्त्यावरून धावणाऱ्या तसेच शोरूमधून अधिकृत विकलेल्या गाड्यांच्या नंबरची माहिती गोळा करून त्याच मॉडेलचे नंबर विकलेल्या गाड्यांना दिले होते. त्यामुळे एकाच नंबरच्या अनेक गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.