मोबाइल ग्राहकाला सेवेत त्रुटी दिल्याचा ठपका
पुणे – मोबाइल ग्राहकाला सेवेत त्रुटी दिल्याप्रकरणी गुगल कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदार यांनी मोबाइल खरेदीवेळी भरलेले 39 हजार 999 रुपये 7 डिसेंबर 2017 पासून 12 टक्के व्याजदराने निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत परत करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे. 45 दिवसानंतर कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. नुकसानभरपाई म्हणून 25 हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
याबाबत दीपक बन्सल यांनी गुगल, 3 नॉर्थ एव्हेन्यू, मेकर मॅक्सिटी, बांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा, पूर्व मुंबई आणि बी 2 एक्स, विमाननगर यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. बन्सल यांनी 7 डिसेंबर 2017 रोजी गुगल पिक्सल 2 हा मोबाइल ऑनलाइन खरेदी केला होता. मोबाइलला दोन वर्षांची वॉरंटी होती. मात्र, महिनाभरातच मोबाइलमध्ये समस्या सुरू झाली.
मोबाइल अचानक रिबूट होत असल्याने बन्सल यांनी कंपनीशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी गुगल कंपनीद्वारे बी 2 एक्सशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी कंपनीने 23 डिसेंबर 2017 रोजी बन्सल यांचा मोबाइल दुरुस्तीसाठी नेत 8 जानेवारी रोजी तो परत दिला. मात्र, आठ दिवसांतच तीच समस्या निर्माण झाली. बन्सल यांनी बी 2 एक्स येथे संपर्क साधला. त्यावेळी 29 दिवसांनंतर मोबाइल पुन्हा दुरुस्त करून दिला. त्यानंतर मोबाइल गरम होऊ लागला.
बन्सल यांनी पुन्हा कंपनीशी संपर्क साधला. त्यावर बी 2 एक्स कंपनीने मोबाइल दुरुस्तीसाठी नेला. त्यावेळी मोबाइलचा मदरबोर्ड बदलल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुरुस्तीवेळी त्याची स्क्रीन खराब झाली होती. याबाबत बन्सल यांनी गुगलशी पुन्हा संपर्क साधला असता, कंपनीने मोबाइल जसा आहे तसा स्वीकारण्यास सांगितले. मोबाइल खराब झाल्यामुळे बन्सल यांना तो वापरता येत नव्हता. समस्येबाबत कंपनीशी ई-मेल, फोनद्वारे संपर्क साधून देखील कंपनीने कारवाई केली नाही. त्यामुळे बन्सल यांनी ग्राहक मंचात धाव घेत दावा दाखल केला. नोटीस बजावूनही कंपनीच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही.