रवींद्र कदम
परराज्यातूनही कोळसा होतो आयात
नगर – जिल्ह्यात सध्या परराज्यातून कोळशाची आयात होत असून हा कोळसा संबंधित गोदामात ठेवला जात आहे. मात्र साठवलेला कोळसा हा वन विभागाने दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त असून एकच परवान्याच्या नावाखाली त्याची साठवणूक व वाहतूक करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज असून त्यांचेच पाठबळ कोळसा माफियांना आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाकडी कोळसा माफिया सक्रिय असून वृक्ष तोडीचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. त्यापासून कोळसा बनवून अनधिकृत गोदाम भरविले जात आहे. तसेच शेजारील जिल्ह्यासह परराज्यातून लाकडी कोळसा आयात करून तो गोदामात साठविला जातो आहे. हा कोळसा इतरत्र वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराला वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी ठेकेदाराला वन विभागाकडून संबंधित कोळशाचे चलन दिले जाते. त्या चलनावरच तो कोळसा इतरत्र विक्रीसाठी वाहतूक करू शकतो. मात्र, असे न होता हे कोळसा माफिया वनविभागाच्या परवान्यापेक्षा जास्त कोळसा साठवून व त्याची विक्रीचा गोरख धंदा सुरु आहे.
सध्या जिल्ह्यात एकाच कोळसा डेपोला परवांनगी असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, गोदामात क्षमतेपेक्षा जास्त कोळसा आहे की नाही याची तपासणी कधी वन विभागाने केली की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गोदामातून दहा परवान्याचा चलनावर तीनपट गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र वन विभाग त्यांना पाठबळ देत असून अधिकाऱ्यांचे ही हात कोळशात काळे झाले आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.