आंबिल ओढा परिसराची पाहणी : वाहने, साहित्य, कचरा ओढ्यात अद्यापही तसाच
पुणे – शहरात पावसाने थैमान घातल्याने सप्टेंबर महिन्यात आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे अवशेष अजूनही ओढ्यात तसेच आहेत. वाहने, साहित्य, कचरा ओढ्यातून अद्याप काढल्याच गेल्या नाही, हे पाहून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मोहोळ यांनी सोमवारी या भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली.
नानासाहेब पेशवे तलावापासून आंबिल ओढ्याची मोहोळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, आयुक्त सौरभ राव तसेच या भागातील सहायक आयुक्त आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
तीन महिन्यांपूर्वी आंबिल ओढ्याला पूर आला. यामध्ये काही नागरिकांना प्राण गमावावे लागले. प्रशासनाने यानंतर कोणती कामे केली आहेत याची माहिती घेण्यासाठी या ओढ्याची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी ओढ्यामध्ये गाड्या, वाहून आलेले साहित्य अद्याप तसेच आहे. ओढ्यामध्ये मरण पावलेली जनावरेदेखील काढण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या कामावर आपण समाधानी नसल्याचे मोहळ यांनी सांगितले.
ओढ्यावर असलेल्या काही पुलांची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही कामे तत्काळ करण्याची गरज आहे. ओढ्याला कोणत्या कारणामुळे पूर आला याचा अभ्यास महापालिका प्रशासनाने केलेला आहे. यामध्ये पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी करायच्या उपाययोजनांची माहिती घेतली. अनेक ठिकाणी सीमाभिंत पडल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत ती काढावीत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
टांगेवाला वसाहत याठिकाणी जीवितहानी झाली होती. याठिकाणच्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आरक्षणात बदल करून पुनर्वसन करावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
धनकवडे यांनी आणून दिली होती बाब निदर्शनास
ओढ्यालगतच्या पुरावेळी ढासळलेल्या भिंती, वाहून गेलेल्या ड्रेनेज लाईन, राडारोडा अद्यापही तसाच आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. या सर्व बाबी माजी महापौर विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी महापालिकेच्या मुख्यसभेत निदर्शनास आणून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिसराची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. यावेळी नगरसेवक धनकवडे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, ड्रेनेज विभाग प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका मनिषा कदम, नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेविका राणी भोसले आदी उपस्थित होते.