गुटख्याची व माव्याची सर्रास होत आहे विक्री
सोनई – नेवासा तालुक्यातील सोनईत गुटख्याची व माव्याची ठिकठिकाणी टपऱ्यावर खुलेआम विक्री सुरू आहे. तसेच मध्यंतरी काही काळ थंडावलेला दारु, मटका, जुगार व्यवसाय पुन्हा एकदा फोफावला आहे. सोनईत मोठ्या वाहनातून खुलेआम गुटखा व माव्याची वाहतूक होत आहे. यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षमतेविषयी उघड बोलले जात आहे. बसस्थानक परिसर, कांगोणी चौक, स्वामी विवेकादं चौक, कारखाना परिसरात, छोट्या टपऱ्या, हॉटेलमध्ये मटका व्यवसाय सुरू आहे.
यामध्ये सोनईतील काही प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांचे संबंध असुन त्याकडे पोलीस, अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करून एक प्रकारे या बेकायदेशीर गुटखा व मावा विक्रीला प्रोत्साहन देत आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी फक्त औपचारिकता म्हणून गावात येऊन थातुरमातूर कारवाया करून जातात, असा आरोपही होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्याच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या तळीरामचा मोठा त्रास होत आहे. अनेक हॉटेलमधून दारू विक्री परवाना नसताना सकाळीच हॉटेलच्या नावाखाली खुलेआम दारू विक्री सुरू आहे.
नदीपात्र, रामझिरा आदी ठिकाणी छुप्या मार्गाने होत असलेल्या दारू विक्रीमूळे व्यापारी, शाळकरी विद्यार्थी, महिला, फिरण्यासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.