काथानिर्मितीसाठी प्रकल्प उभारणी : दररोज 50 टन नारळावर प्रक्रिया
पुणे – शहाळ्यापासून उत्तम दर्जाचा काथ्या तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात आला आहे. युनिटी ग्रीन सोल्यूशन्स प्रा. लि कंपनीच्या सहकार्याने महापालिकेने हा प्रकल्प कल्याणीनगर येथे उभारला आहे. तर पेशवे उद्यान आणि या प्रकल्पात दिवसाला 50 टन शहाळ्यावर प्रक्रिया करून “कोकोपीठ’ तयार करण्यात येत आहे. काथ्याची मशीनही नुकतीच कल्याणीनगर येथे बसवण्यात आली आहे. तर, असा प्रकल्प राबवणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे.
शहरात उद्याने, हॉस्पिटल तसेच अनेक ठिकाणी फळविक्रेत्यांकडे शहाळे असतात. अनेकदा ही पाणी पिल्यानंतर शहाळी कचऱ्यात टाकली जातात, तसेच बऱ्याचदा ती रस्त्यावर तशीच फेकली जातात. त्यात पावसाचे अथवा इतर पाणी साठल्यानंतर पुन्हा डेंग्यूच्या डासांची पैदास होते, तर ते हे शहाळे मिश्र कचऱ्यात आल्यावर त्यावर प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे शहाळ्यांवर तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून त्यांचे “श्रेडिंग’ करुन त्याचे खतासाठीचे कोकोपीठ करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
आता पुढच्या टप्प्यात या शहाळ्यांपासून काथ्या निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने जागा आणि इतर सुविधा दिल्या असून ग्रीन सोल्यूशन्स कंपनीकडून काथ्या तयार करण्याची यंत्रणा उभारली आहे. कल्यानीनगर येथे या प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. प्रकल्पास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी भेट दिली आहे.
या प्रकल्पामुळे शहरातील शहाळ्यांच्या कचऱ्याची समस्या संपणार असून शहाळी संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. यात शहरात 7 ठिकाणी संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.
बचत गटांना देणार विक्रीचे काम
कल्याणीनगर नंतर आता काथ्यानिर्मिती लवकरच पेशवे उद्यानातही सुरू केली जाणार आहे. त्यानंतर तयार होणारा काथ्या बचत गटांच्या महिलांमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा काथ्या नाममात्र दरात बचत गटांना देऊन त्याद्वारे पायपुसणी तसेच इतर गृहपयोगी व सजावटीच्या साहित्यांची निमिर्ती करून त्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळणार आहे.