प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे; निधी वितरण, मंजूर कामांवर सुलभ रितीने संनियंत्रण
सातारा – जिल्हा नियोजन समितीच्या “आयपास’ प्रणालीमुळे जिल्हा वार्षिक योजनांचे कागदविरहीत कामकाज होऊन प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके मागवणे, प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व मंजूर कामांवर पारदर्शकपणे संनियंत्रण राहील. योजनांची उत्कृष्टरित्या गतीने अंमलबजावणी होऊ शकेल, असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता व दस्तऐवज संगणकीकृत करून कागदविरहीत कामकाज करण्यासाठी “आयपास’ या वेब बेस्ड संगणकीय प्रणालीचे उद्घाटन व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय धोत्रे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मेंद्र काळोखे, कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भगवान जगदाळे यांनी “आयपास’ संगणकीय प्रणालीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
रामचंद्र शिंदे म्हणाले
जिल्हा नियोजन समितीकडून संनियंत्रित योजनांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. मंजूर कामांचे जिल्हास्तरीय पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे निरीक्षण सोपे होणार आहे. योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रणालीची माहिती करुन घेऊन सूचनेप्रमाणे प्रणालीत कामे करावीत.