तालमीपेक्षा जिमकडे जाण्याचा वाढता कल
इंदोरी – हिवाळ्याची चाहूल लागताच आणि नुकत्याच झालेल्या दिवाळीमधील फराळानंतर आता हेल्थ कॉन्शिअस तरुणाईची पावले जिमकडे तसेच योगा क्लासकडे वळू लागली आहेत. व्यायामाचा “श्रीगणेशा’ करण्यासाठी हा ऋतू उत्तम समजला जात असल्याने सध्या मावळ परिसरातील व्यायामशाळेमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
आरोग्यासाठी उत्तम ऋतू म्हणून हिवाळ्यात शरीरयष्टी कमाविण्यासाठी आणि फिटनेससाठी अनेकांची पावले जिमकडे वळू लागली आहेत. अनेक जण वाढलेले वजन कमी करण्यासोबत फक्त फिट राहण्यासाठी व्यायाम सुरू करताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये कमकुवत झालेली पाचनशक्ती हिवाळ्यात सुधारू लागल्याने या ऋतूमध्ये जास्त भूक लागते. त्यामुळे या काळात केलेला व्यायाम शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो.
नियमित व्यायाम, योग्य आणि पौष्टिक आहार घेतल्यास पुढे वर्षभर शरीरसंपदा राखता येते. त्यामुळे हिवाळ्यात फिटनेस सेंटरमध्ये नवीन सदस्यांची संख्या वाढत असलेल चित्र दिसून येत आहे.
हिवाळ्यात उत्साहापोटी जिम लावणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, ती कायम टिकविणे कठीण जाते. थोड्या दिवस तरुण-तरुणी न चुकता रोज जिममध्ये आपली हजेरी लावतात. परंतु काही महिन्यांतच जिम सोडून देतात. बहूतेक मुलांचा तालीमपेक्षा जिमकडे जाण्याचा कल जास्त असतो, तर त्या तुलनेत मुलींचा झुंबा, ऍरोबिक्स आणि योगासने करण्याकडे कल आहे. एक व्यायाम कंटाळवाणा होत असल्याने ग्रुप ऍक्टिव्हिटीला प्राधान्य मिळते, असे प्रशिक्षक सांगतात.
व्यायाम करताना प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार वेगळा व्यायाम प्रकार असतो. जिममध्ये वजन कमी करण्यासाठी हलक्या वजनाचे व्यायाम, जास्त वजन असणाऱ्यांसाठी, वजन वाढविण्यासाठी व्यायाम ठरलेले असतात. मसक्युलर बॉडीसाठी वेगळी व्यायामपद्धती आहे. व्यायाम देण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीचे आजारही लक्षात घेतले जातात.
धोक्याची घंटा चिंतेचा विषय
शरीराला आकार देण्यासाठी काही तरुण “प्रोटीन पावडर’ असेल किंवा घातक केमिकल्सचे सेवन करतात. मावळ परिसरात बहुतेक ग्रामीण परिसरातील तरुण कमी वेळेत भरगच्च बॉडी तसेच पिळदार शरीरयष्टीसाठी या गोष्टीच्या “आहारी’ जातात. योग्य माहितीचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे तरुण आपली शरीरयष्टी घडवतात का बिघडवतात असा प्रश्न प्रशिक्षकांसह वैद्यकीय तज्ज्ञांना नेहमीच सतावतोय.
प्रत्येकाने स्वत:साठी वेळ काढावा…
कमी कालावधीमध्ये बनवलेली बॉडी ही घातक तर जीवघेणी देखील होऊ शकते याची काळजी मावळ परिसरातील तरुणाईने घ्यावी, असे या क्षेत्रातील अनुभवी बॉडी बिल्डर सांगत आहेत. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जिमला जाणे शक्य नसेल, तर स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटे काढून घरीही हलक्या प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो. दंड बैठका, सूर्यनमस्कार, योगासारखे व्यायाम घरी योग्य मार्गदर्शनाने केले जाऊ शकतात.