सावत्र बापाविरूद्ध गुन्हा दाखल
पिंपरी – आई-वडीलांच्या किरकोळ भांडणातून सावत्र बापाने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरूवारी (दि. 12) सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आज धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांनी मुलीचा खून करण्यापुर्वी तिच्यावर अत्याचार केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
संबंधित आरोपी बापाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने पतीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 44 वर्षीय नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व तिचा पती यांचे गुरूवारी सकाळी भांडण झाले होते. त्यानंतर आरोपी पती घराबाहेर गेला होता. त्यानंतर तो काही वेळाने परत आला. तसेच, पुन्हा पत्नीसमवेत भांडू लागला.
पत्नीला शिवीगाळ करुन “आज तुला पिक्चर दाखवतो” अशी धमकी दिली होती. त्यावर पत्नीनेही प्रत्युत्तर देत “तु काय मला पिक्चर दाखवतोस; थांब मीच तुला ट्रेलर दाखवते, माझ्या मुलींना हात तर लावून बघ” असे म्हटले. त्यानंतर काही वेळातच आरोपी पतीने मुलीच्या तोंडावर मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेची दुसरी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर उघडकीस आला. दरम्यान, मुलीचा खून करण्यापुर्वी नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उत्तरीय तपासणीत पुढे आले आहे.
याप्रकरणी सुरुवातीला भोसरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सोच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे.