सर्वसाधारण सभा वादळी : नगराध्यक्ष, प्रशासनास धारेवर धरले
तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या विविध विकासकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भ्रष्टाचाराबाबत नगरसेवकांनीही यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्याच्या मागणीला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही याबाबत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी कोणतीही दखल घेतली नाही. या मुद्द्यावरून तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा आणि प्रशासनास राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत आघाडीच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या नगाराध्यक्षासह प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
या संदर्भात विरोधी पक्षनेते गणेश खांडगे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, सुलोचना आवारे, किशोर भेगडे, गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, रवींद्र आवारे, वैशाली दाभाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. सदस्यांच्या प्रश्नांवर नगराध्यक्षांची कोंडी झाल्याने त्यांनी सभा अर्धातास तहकूब करण्याचे आदेश दिले. त्यावर जोरदार आक्षेप पडल्याने अखेर ही सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर चर्चा न होताच ती रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षा जगनाडे यांच्यावर आली.
नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता सभा सुरू झाली. नगरसेवक गणेश खांडगे यांनी पटलावरील विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. पाच महिने सर्वसाधारण सभा न घेणे व समिती गठन करून अहवाल सभागृहासमोर न ठेवणे या मुद्द्यावर गणेश काकडे, गणेश खांडगे यांनी नगराध्यक्षांना “लक्ष्य’ केले. भ्रष्टाचार मुक्त कारभार महत्वाचा की सभा, यावर मतदान घेण्याची मागणी केली. या मागणीला बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, सुलोचना आवारे, रवींद्र आवारे, संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे आणि सदस्यांनी जोरदार पाठिंबा देत सभा बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली.
सभागृहास न कळविता नगरपरिषदेच्या फंडातून शहरातील ओढे बुजविणे, ठराविक बांधकाम व्यावसायिकांना ना-हरकत व भोगवटा प्रमाणपत्रे देणे, कचरा गाड्या वापरल्याचे दाखवून ठेकेदारांनी त्याबदल्यात बिले अदा करणे, पाणी मीटर बसविण्यात मोठा भ्रष्टाचार करणे, हिंदमाता अंडरपास पूलाचे सदोष काम आणि रस्त्यासाठी नियोजन न करणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप भेगडे यांनी केले. याबाबत चौकशी समिती स्थापन करून पुढील सभेत अहवालासह स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक संतोष भेगडे यांनी नगरपरिषदेच्या सुमारे 40 कोटींच्या मुदत ठेवी मोडण्यावर आक्षेप घेतला. तळे विकासाच्या खोदाईसाठी 6 कोटी 39 लाख रूपये कशा स्वरुपात खर्च केले, असा सवाल करून त्यात झालेला भ्रष्टाचारासमोर आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. चर्चेत उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, बापूसाहेब भेगडे, सुलोचना आवारे, किशोर भेगडे, गणेश खांडगे, हेमलता खळदे, गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, रवींद्र आवारे, वैशाली दाभाडे, शोभा भेगडे, अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे यांनी भाग घेतला.
“चौकशी समिती अर्धवट’…
दरम्यान, सात जणांची चौकशी समिती स्थापन करून आठ दिवसांत त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर तात्काळ ही सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. या सात जणांच्या चौकशी समितीत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक अरुण माने, गणेश काकडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, हेमलता खळदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र भाजपाच्या कुणाचेही नाव पुढे आले नाही. त्यामुळे ही समिती अर्धवट राहिली.
तळेगाव नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे. चौकशी समितीचा अहवाल सभागृहात सादर होईल. त्या अहवालात तथ्य आढळले, तर देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डच्या कारभाराची “सीबीआय’ने ज्या पद्धतीने कारवाई केली, तशीच कारवाईस संबंधितांना सामोरे जावे लागेल. हा अहवाल तयार झाल्यानंतरच विशेष सभा बोलवावी. नगरपरिषेचा कारभार भ्रष्टाचारी असून, त्यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही.
– बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती.